:
श्रीगुरुजवळ काय मागावे तर "अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला." हे सद्गुरुराया, तुझ्या पदकमली रमून जाणारी, अवीट गोडी असलेली, अशी ती अमला भक्ति तेवढी मला द्या. अमला भक्ति = शुद्धभक्ति, परमश्रेष्ठ भक्ति असाच तिचा अर्थ आहे. अशी ही अमला भक्ति भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ज्याचे मन, बुद्धी, काया, आणि वाचा पूर्ण शुद्ध झालेली असते, जो आनंद, समाधान, प्रसन्नता यांचाच जणू प्रत्यक्ष मूर्तिमंत आकार असतो. स्वतः भगवंताचा, सद्गुरूंचा दास म्हणवून घेण्यातच ज्याला कृतार्थता वाटत असते असा भक्त जी भक्ती करतो तीच अमला भक्ती.
" मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी । सर्वांग निर्मळ । चित्त जैसा गंगाजळ ॥ " असा असून जो भक्तीच करतो ती अमला भक्ती. अशा भक्ताच्या ठायी मग विवेक, वैराग्य, ज्ञान अगदी सहजपणाने प्रकट होतात. त्या शिवाय त्याच्या ठिकाणी रसमयता, आनंद हा त्या भक्ताचा उल्लेखनीय विशेष असतो. श्रद्धा, निखळ भक्तीप्रेमभाव त्याच्या ठिकाणी ओसंडून वाहात असतो बघ. तो सदा सर्वदा समर्पितच होऊन गेलेला असतो. ही सर्व लक्षणं तर अतिश्रेष्ठ भागवतांची सामान्य लक्षणं आहेत.
असा भक्तभागवत मग देवाजवळ, श्रीगुरुंजवळ अशा अमला भक्तीशिवाय दुसरं काय मागणार ? नामदेवासारखे श्रेष्ठ भक्तराज काय मागतात बघ ! "देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हा जन्मा ॥" असा लडिवाळ हट्ट भक्तच फक्त आपल्या देवाकडे, श्रीगुरुंकडे करू शकतात. भगवंताशी, श्रीगुरूमाऊलीशी अशा भक्ताचे एक अतूट, अत्यंत सुंदर, नितांत रमणीय, परमविशुद्ध आणि ऋजु असेच नाते जमून गेलेले असते. भक्तिप्रेम - प्रेमभक्ति या पलीकडे त्याला कांही कळत नाही. तो काही पाहात नाही आणि अनुभवीत सुद्धा नाही. याला 'संयोगदीक्षा' असं भक्तिशास्त्रकार म्हणतात. "मिळोनि मिळतची असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होवोनी मज तैसे । सर्वस्वे भजती ॥" अशी त्या भक्ताची अवस्था होऊन गेलेली असते. भक्त भगवंताला सर्वार्थानी, सर्वांगानी समर्पित होतो. आणि पहा भगवंत तर त्याचा स्वतःहून अंकित होऊन राहतो. अशा त्या भगवंतालाही प्रिय असण्यार्या अमला भक्तीची प्राप्ती होऊन, तद्द्वारा अमलानंद (म्हणजे परमपवित्र, परमश्रेष्ठ आनंद) आपल्याला प्राप्त व्हावा अशीच मागणी भक्त भगवंताजवळ, श्रीगुरुरायांजवळ करत असतो. समुद्रावर समुद्राची लाट आनंदाने, अत्यानंदाने क्रीडा करते. आकाशात वारा अगदी मुक्तपणे वाहात असतो, तसेच भक्ताचे असणे म्हणजे भगवत् सत्तेतील आनंदक्रीडाच असते.
परमरसाने अमृतरसाने रसना ओलावली, मनाची वृत्ती आनंदकंदाच्या चरणी राहिली, या विश्वातील सगळी मांगल्ये एकत्र येतात, आनंदजळाचीच वृष्टी होते, मग अशाने सगळीच्या सगळी, अगदी सगळीच्या सगळी इंद्रिये ब्रह्मरूप होतात, त्यांना सर्व क्रियाकर्मामध्ये एका स्व-स्वरूपाची, आत्मस्वरूपाचीच प्रचिती येते, त्याच्याजवळ प्रत्यक्ष देवच नांदत असतो.
अशी अमला भक्ती लाभलेला भक्त सहजच स्वरूपज्ञानी असतोच. ज्ञान, कर्म, योग त्याच्या ठिकाणी सहजच नांदू लागतात. तो तत्त्वज्ञ, भक्त आणि जीवनमुक्तही असतो. थोडक्यात सांगायचे तर तो परमार्थाचे भूषणच होऊन गेलेला असतो. भगवंतानी स्वमुखाने अशा भक्ताचे वर्णन केले आहे. झाडाच्या फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या असतात; सूर्यकिरणे अनंत असली तरी ती जशी एकाच सूर्याची असतात, तसेच प्राणीमात्र भिन्न भिन्न असले तरी त्यांच्या अंतर्यामी एकच एक परमात्मा भरून राहिलेला असतो.
भक्त हा स्वरूपज्ञानी असतोच. रामकृष्ण म्हणत "मूल वृद्ध होण्याचे नाकारीत असेल तर ती विकृतीच मानावी लागेल. बीजाचा अंकुर, अंकुराचे रोपटे, रोपट्याचा वृक्ष असाच विकास झाला पाहिजे. तसाच भक्त हृदयाचा पण विकास झाला पाहिजे आणि भक्तीने तो होतोच होतो. सर्वत्र भरून राहिलेले, विलसत असलेले चैतन्य हे आपल्या उपास्य दैवताचे, श्रीपांडुरंगाचे खरे व्यापक स्वरूप आहे हे त्याला ओळखता येते. सर्व रूपानी सर्वत्र एक आपला पांडुरंगच नटला आहे असा व्यापक अनुभव त्याचा असतो. "जेथे तेथे देखे, तुझीच पाऊले । विश्व अवघे कोंदाटले ॥ अशा व्यापक स्वरूपावर आरूढ झाल्यावर पुन्हा त्याचे नामाचा उच्चार, स्मरण, चिंतन नित्य व्हावे हेही मागणे भगवंताजवळ असतेच.
No comments:
Post a Comment