आंतरजालावरून
.
परमार्थात सद्गुरूंची किती आवश्यकता आहे ते उपनिषदांपासून ज्ञानेश्वरमहाराज तुकोबारायांपर्यंत सार्यांनी एकमुखाने सांगितले आहे. आत्मज्ञान हे अत्यंत गहन असल्यामुळे (राजविद्या राजगुह्यं) ते केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी ज्याने ते करून घेतले आहे, अशा आत्मज्ञानी श्रीगुरूची मोठी आवश्यकता आहे. कठोपनिषदांत असे अगदी सुस्पष्ट व ठामपणे म्हटले आहे. पारमार्थिक अज्ञानाची काळोखी रात्र श्रीगुरुकृपेच्या सूर्योदयावांचून उजळत नाही.
श्रीगुरू हा सत्शिष्याने - साधकाने परीश्रमपूर्वक साधनबाग फुलवणारा उपायन वसंत आहे. एका मूळसिंचनाने लता वेली वृक्षाच्या शाखापल्लवांना टवटवी यावी, त्याप्रमाणे एक गुरुभक्तिने, गुरुसेवेने (म्हणजे गुरुपदिष्टित साधनाने) साधक 'पूर्णकाम' कृतकार्य होतो; असा खुद्द श्रीगुरुज्ञानेश्वर माऊलीचा निर्वाळा आहे. गुरुकृपा ही आत्मानंदाच्या भांडारगृहाची एक किल्लीच आहे. प्लेटो सारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञानेंही "गुरुमुखांतून लाभणारे जीवनज्ञान व पुस्तकातील निर्जीव ज्ञान यांची तुलनाच होऊं शकत नाही" असे म्हणून श्रीगुरूची आवश्यकता प्रतिपादिली आहे.
'सद्गुरू शिष्यासाठी काय करतात ?' दूरध्वनीच्या उपमेने हे छान स्पष्ट करून सांगता येईल. आपल्याला दूरवर कोणाशी बोलावयाचे असेल तर आपण क्रमांक फिरवितो, आणि एक्सचेंजच्या द्वारा तो क्रमांक जोडला जातो. हेंच कार्य श्रीसद्गुरु करतात. ते देव व भक्त यांची गांठ घालून देतात. विजेच्या पॉवर हाऊसची उपमा देऊन असे म्हणता येईल कीं, श्रीसद्गुरु म्हणजेच साक्षात्कारी संत. हे विजेच्या मुख्य तारांप्रमाणे असून आपण सर्वजण त्या तारांच्या उपशाखांना लावलेल्या विजेच्या दिव्यांप्रमाणे आहोत. मुख्य तारांतून विद्युतप्रवाह आला कीं सर्व दिवे एकदम प्रकाशतात. त्याचप्रमाणे साक्षातकारी संतांच्या अंतःकरणांत भरून राहिलेला भगवंताच्या चित्प्रकाशाचा झोत त्यांच्याशी संबद्ध झालेल्या त्या साधकांच्या - शिष्यांच्या अंतःकरणांत चित्प्रकाश उत्पन्न करतो.
जेथें देव जागा झाला आहे, त्याच्याशी संलग्नता साधली कीं देव अगदीं हमखास संपडतोच. यासाठीं नादाच्या निनादाचा (resonance) दृष्टांतहि चांगलाच लागू पडतो. सुरात लावलेल्या सतारीची एक तार छेडली, तर दुसर्या बाकीच्या तारा आपोआपच वाजू लागतात. त्याप्रमाणे आत्मानंदाचा दिव्य झणत्कार ज्यांच्या ठिकाणी झणाणत असतो, त्यांच्या संगतीने, तो त्याच्या सत्शिष्यालाही प्राप्त होतो.
"अंतरीं गेलियां अमृत । अवघी काया लखलखीत॥" या न्यायाने ज्याच्या अंतरीं स्वरूपस्थिती बाणली असा साक्षात्कारी सहजच गुरूत्वाला पोहोचतो. ज्याच्याकडे पाहिले असतां भगवंताकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत, तो श्रीगुरू. हे श्रीगुरु आपल्या शिष्याला त्याच्या ठिकाणींच गुप्त रूपांत असलेल्या स्वात्मानंदाची स्वानुभवाच्या पातळीवर ओळख करून देतात.
श्रीगुरू स्वतः भगवत्नामाचा प्याला भरभरून आपण तर पितातच व आपल्या सत्शिष्यालाही पाजतात. "सेवितो हा रस, वाटतो आणिका ।" असं तुकोबारायपण म्हणतात. नामस्मरणांत भाव फार महत्त्वाचा. भगवंताला पण हा अंतःकरणातील भाव फार फार प्रिय. आणि हा भाव निर्माण होण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. "सार, सार,
सार नाम, विठोबा नाम तुझे सार"
असे नाम श्रेष्ठ कां ? तर हे नाम भगवंताच्या रूपाचा - आनंदाचा अनुभव आणून देते म्हणून. नाम हे तेल असून त्यांत मनाची वात चांगली भिजवली असतां भगवंताच्या रूपाची ज्योत श्रीगुरुकृपादृष्टी काडीने पेटते. नाम हे सगुण व निर्गुण या भगवंताच्य दोहीं स्वरूपाचे साक्षी असून स्वानंदाचा प्रकाश नामधारकाच्या जीवनांत पसरविणारी दिव्य स्वयंभू ज्योतच आहे. अशा नामाचाच श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला दिव्य नाम अगर सबीजनाम असे म्हणतात. अशा सबीज नामाचे रुपांतर पारमार्थिक अनुभवाच्या वृक्षांत होते.
श्रीगुरू नाम-बीज देतात. पोते भरून खाण्यासाठी फुकट दाणे देत नाहीत. ते बीज नाम साधनेच्या शेतांत पेरून, राबून, मशागत निगराणी करून स्वतःच पिकवावी लागते. असे दिव्य नाम पूर्वजन्मींचे सुकृत असल्याशिवाय थोडेच मिळते ?
No comments:
Post a Comment