(प्रस्तुत लेख आजपासून किमान ६२ वर्षांपूर्वी योगीराज गुळवणी महाराजांनी आपले गुरू प.प.प. लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या आदेशावरून इंग्रजी भाषेत लिहिला व गोरखपूर येथून निघणार्या ‘कल्याण’ या मासिकाने तो प्रसिद्ध केला. वास्तविक, ‘शक्तिपात दीक्षा’ चे संपादक श्री. त्र्यंबक भास्कर खरे यांनी इ.स. १९३४ मधे कुंडलिनी महायोगावर एक लेख दिला होता, ज्यात स्वामी लोकनाथ तीर्थांचा उल्लेख होता आणि श्री. वामनराव गुळवणी, २०,
नारायण पेठ असा पूर्ण पत्ता दिला होता. हा लेख स्वामीजींनी काशी येथे वाचला आणि अपुरा वाटून त्यांनी आपले शिष्य श्री. वामनराव गुळवणी, पुणे यांना योग्य लेख लिहून कल्याण मासिकास पाठवण्यासंबंधी सूचना केली.)
श्रेष्ठ आध्यात्मिक गुरू आपल्या शिष्याकडे जे दैवी शक्तीचे संक्रमण (Transmission)
करतो, त्या विशिष्ट प्रक्रियेला ‘शक्तिपात वा दैवी शक्तीचे संक्रमण’ असे म्हणतात. असा शक्तिपात करण्याचे सामर्थ्य असलेले सद्गुरू सत्याचे ज्ञान, परमात्म्याशी एकरूप होण्याचे ज्ञान, सुयोग्य शिष्याला विनासायास, क्षणार्धात देऊ शकतात. इतकेच नाही तर ते आपल्या शिष्याला आपल्यासारखेच करू शकतात. ‘स्वीयं साम्यं विधत्ते।‘ अशी घोषणा श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी आपल्या ‘वेदान्त केसरी’ या महान ग्रंथाच्या पहिल्या श्लोकातच केली आहे. महाराष्ट्रातील महान संत श्री. तुकाराम महाराज यांनी देखील आपल्या एका अभंगात याच विचारांची पुनरावृत्ती केली आहे. त्यांनी सांगितले आहे- “आपुल्यासारिखे करिती तात्काळ, नाही काळ-वेळ तयां लागीं.” अशा सद्गुरुंचे वर्णन करण्यासाठी परीसाची उपमा देखील कमीच पडते, किंबहुना त्या गुरूची महती अवर्णनीय आहे. ’भावार्थदीपिका’ या भगवद्गीतेवरील टीकेमधे संतांचे मुकुटमणी संत ज्ञानेश्वर महाराज स्वत:च्या शब्दात सांगतात, “श्रेष्ठ गुरूचे मोठेपण एवढे आहे की, ज्या व्यक्तीवर त्यांचा दृष्टिकटाक्ष पडतो वा ज्याच्या मस्तकावर ते आपला कमलहस्त ठेवतात, ती व्यक्ती कितीही क्षुद्र वा निकृष्ट असली तरीही तात्काळ तिला परमेश्वराचा दर्जा प्राप्त होतो. ज्या कुणाला अशी सद्गुरूकृपा प्राप्त होण्याचे सद्भाग्य मिळते तो सार्या द्वंद्वांपासून मुक्त होतो आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. गुरू शिष्याला ‘महावाक्यं’ (औपनिषदिक वाक्यं वा मंत्र) देतात आणि शिष्य लगेचच त्याचा स्वीकार करतात. त्याच क्षणी त्या मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव देखील शिष्याला मिळतो. श्रीकृष्णाने आपल्या परमभक्त अर्जुनास दिव्य शक्ती संक्रमित करून त्याला स्वत:सारखे कसे बनविले याचे वर्णन पुढे श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे, “भगवंतांनी आपला नीलश्यामल, तेजस्वी मणिकंकणाने विभूषित दक्षिणहस्त पुढे केला आणि आपल्या प्रिय शिष्याला आलिंगन दिले. बुद्धी वा वाचागम्य नसलेला हा अनुभव भगवंतांना आपल्या प्रियशिष्याला द्यायचा होता, त्यासाठी हे आलिंगन! द्वैताचा भेद न करता दोन मनांचे मीलन झाले. एकातले ज्ञान दुसर्याच्या ठिकाणी संक्रमित झाले. अर्जुन कृष्णाशी एकरूप झाले.”
ब्रह्माची प्राप्ती शास्त्राभ्यासाने होत नाही तर केवळ सद्गुरूकृपेमुळेच ते प्राप्त करता येते. श्री. समर्थ रामदास स्वामींनी उच्चरवाने सांगितले आहे,” सद्गुरूशिवाय खरे ज्ञान प्राप्त होणे असंभव आहे.” शास्त्र देखील त्याच्याशी सहमत आहे. “केवळ शब्द, बुद्धी वा औपनिषदिक ज्ञान वा त्यांवरील चर्चा ऐकून आत्मज्ञान होऊच शकत नाही“. ते केवळ सद्गुरुंच्या कृपाप्रसादामुळेच होऊ शकते. श्रीमद् शंकराचार्यांनी एका सुंदर श्लोकात सद्गुरुंच्या अमृतमय दृष्टिकटाक्षामुळे निर्माण होणार्या शक्तीचे वर्णन केले आहे, जे अतुलनीय आहे.
तद् ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभव उदितो यस्य कस्यापि चेद्वै ।
पुंस:श्रीसद्गुरूणामतुलितकरुणापूर्णपीयूषदृष्ट्या।
जीवन्मुक्त: स एव भ्रमविधुरमना निर्गते नाद्युपधौ ।
नित्यानन्दैकधाम प्रविशति परमं नष्टसंदेहवृत्ति: ॥
अहं ब्रह्मास्मि। मीच ब्रह्म आहे या सत्याची जाणीव सद्गुरुंच्या अतुलनीय कृपादृष्टिमुळे ज्याला प्राप्त होते तो या देहात राहून देखील मनातील सारे संशय तसेच मोह यांपासून मुक्त होतो. आणि तो चिरंतन आनंदधामी प्रवेश करतो.
अशा प्रकारे वेद, पुराणे, तंत्र, आणि सर्व काळांतील संतांनी शक्तिसंक्रमण मार्गातील स्वानुभव लिहून ठेवले आहेत. ’योगवासिष्ठ’ या ग्रंथात वसिष्ठ ऋषींनी स्वत: श्री रामचंद्रांना दिलेल्या शक्तिपाताच्या सत्याचे वर्णन केले आहे. ज्यामुळे असंप्रज्ञात समाधी वा पूर्ण ब्रह्माप्रत रामचंद्रांची गती संभव झाली. या संदर्भात स्वत: विश्वामित्रांनी वसिष्ठांना असे सांगितले आहे,”हे महात्मा, ब्रह्मपुत्र,
वसिष्ठ मुनी ! आपण खरोखर श्रेष्ठ आहात. आपले श्रेष्ठत्व आपण क्षणभरात शक्तिसंक्रमणाद्वारे सिद्ध करून दाखविले.”
योगवासिष्ठ्यामध्ये शिष्यांत शक्तिसंक्रमण करण्याच्या पद्धतींचे वर्णन केले आहे.
“दर्शनात्स्पर्शनाच्छब्दात्कृपया शिष्यदेहके” (सद्गुरुंच्या कृपायुक्त दृष्टिकटाक्षाद्वारे, स्पर्शाने, प्रेमपूर्ण शब्दांनी शक्तिसंक्रमण घडून येते.) स्कंद पुराणातील सूतसंहितेत शक्तिसंक्रमणाच्या पद्धतीची विस्तृतपणे माहिती दिली आहे. तंत्रग्रंथांमध्ये देखील शक्तिसंक्रमणाद्वारे कुण्डलिनी जागृत करण्याबद्दलची विस्तृत माहिती दिली आहे. शक्तिसंक्रमणाद्वारे शिष्यांमध्ये सुप्त शक्ती जागृत करण्याबाबत उपलब्ध ग्रंथांमधील नाथसंप्रदायाचे साहित्य अधिक प्रसिद्ध आहे. आत्मविद्या,योगशास्त्र यांच्याइतकाच हा पंथदेखील प्राचीन आहे. सांप्रत काळी या प्रबळ आणि प्रभावी शक्तीचे संक्रमण घडवून आणणारे सद्गुरू अत्यंत दुर्मिळ आहेत. परंतु ते अगदीच उपलब्ध नाहीत असे नाही. अशा प्रकारचे काही महात्मे या जगात गुप्त रूपाने (वेषांतर करून) संचार करीत असतात. जेव्हा त्यांची भेट सत्पात्र शिष्याशी होते तेव्हा ते आपली शक्ती त्या शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करतात.
अशा प्रकारे ज्ञान व शक्तीचे संक्रमण करून शिष्याची कुण्डलिनी जागृत करण्याचे सामर्थ्य असलेले गुरू कधीतरी कुठेतरी भेटतात. अशाच एका महात्म्याशी माझी घडलेली भेट आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेला अनुभव हेच माझ्या या लेखाचे मूळ कारण आहे.
1. सामान्य वाचकांना कदाचित् या लेखाच्या वाचनाचा व्यावहारिकदृष्ट्या काही उपयोग होणार नाही. परंतु असे महात्मे पूर्णत्व संपादित केलेले देखील असू शकतात. त्यांच्याकडून शक्तिसंक्रमणाद्वारे कृपा प्राप्त करून शिष्याला आपले कल्याण करून घेता येऊ शकते. शिष्याला एवढा विश्वास वाटला तरीही मी म्हणेन, माझे प्रयत्न सफ़ळ झाले. कारण कोण्या साधकाची अशा पूर्ण महात्म्याशी भेट घडली आणि त्याने कृपा संपादित केली तर त्या साधकाच्या मनुष्यजन्माचे अक्षरश: सार्थक होईल.
योगदर्शनाचा मुख्य हेतू समाधी अवस्थेप्रत पोहोचणे हा आहे. ज्या स्थितीमध्ये मनाच्या सर्व अवस्था व भाव लय पावतात, ती स्थिती साध्य होण्यासाठी शिष्याला अनुभवी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कठीण अशा अष्टांगयोगमार्गाची साधना करावी लागते. या अभ्यासात जराही त्रुटी राहिली तर ही साधना शिष्यासाठी त्रासदायक ठरू शकते. या शक्यतेमुळे घाबरून पुष्कळसे शिष्य या मार्गाचा स्वीकारच करीत नाहीत. कारण या मार्गामध्ये आसन, प्राणायाम, मुद्रांचा अभ्यास, कुण्डलिनी शक्तीची जागृती यांचा समावेश होऊन त्यानंतर पृष्ठवंशरज्जुतंतू ( पाठीच्या कण्यातून जाणारा रज्जुतंतू ) मध्ये जाणाऱ्या मध्यवर्ती नाडीचे प्रवेशद्वार उघडते. परंतु शक्तिपात मार्गाने उपरोल्लेखित सगळ्याच गोष्टी विनासायास, शीघ्र प्राप्त करता येतात.
जो शिष्य निरोगी, तरुण आहे आणि ज्याचे मन तसेच इंद्रिये ताब्यात आहे आणि जो वर्णाश्रमधर्माचे पालन करणारा आहे, ज्याची देव व सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा आहे अशा साधकांवर शक्तिसंक्रमणाचे परिणाम लगेचच होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती ही की सद्गुरूंची प्रामाणिक सेवा करून त्यांची कृपा संपादन करणे हे आहे.
खालील श्लोकात शक्तिसंक्रमणाच्या चार पद्धती सांगितल्या गेल्या आहेत.
विद्धि स्थूलं सूक्ष्मं सूक्ष्मतरं सूक्ष्मतममपि क्रमत: |
स्पर्शन- भाषण – दर्शन- संकल्पजने त्वतश्चतुर्धा तत् ।|
अशा प्रकारे 1) स्पर्शाद्वारे 2) शब्दोच्चाराद्वारे 3) दृष्टिकटाक्षाद्वारे 4) संकल्पाद्वारे संक्रमित केली गेलेली शक्ती क्रमश: स्थूल. सूक्ष्म, सूक्ष्मतर तसेच सूक्ष्मतम असते.
यथा पक्षी स्वपक्षाभ्यां शिशून् संवर्धयेच्छनै: ।
स्पर्शदीक्षोपदेशस्तु तादृश: कथित: प्रिये ॥
स्वापत्यानि यथा कूर्मी वीक्षणेनैव पोषयेत् ।
दृग्दीक्षाख्योपदेशस्तु तादृश: कथित: प्रिये ॥
यथा मत्स्यी स्वतनयान् ध्यानमात्रेण पोषयेत् ।
वेधदीक्षोपदेशस्तु मनस: स्यात्तथाविध: ॥
वर दिलेल्या श्लोकांत दीक्षेच्या तीन पद्धतींचे वर्णन केले गेले आहे.
1) स्पर्शदीक्षा – एखादा पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या उबेत पिलांना वाढवतो त्याप्रमाणे स्पर्शाद्वारे दिली जाणारी दीक्षा.
2) दृष्टिदीक्षा– कासवीण ज्याप्रमाणे सतत निरीक्षण करीत आपल्या पिलांना मोठे करते त्याप्रमाणे नजरेने दिली जाणारी दीक्षा.
3) वेध दीक्षा– ज्याप्रमाणे मासोळी केवळ चिंतनाने आपल्या पिलांचे भरण पोषण करते त्याप्रमाणे केवळ ध्यानातून दिली जाणारी दीक्षा.
या पद्धतींमध्ये शब्ददीक्षेचा उल्लेख नाही. (शब्ददीक्षा ही दोन प्रकारची असू शकते–मंत्रोच्चाराद्वारे वा केवळ आशीर्वचनाचे उच्चारण करून यौगिक शक्ती जागृत करणे.)
यापुढील श्लोकात शक्तिसंक्रमण घडून आल्यावर शिष्यामध्ये जे बदल दिसतात त्या लक्षणांचे वर्णन केले आहे.
देहपातस्तथा कम्प: परमानन्दहर्षणे ।
स्वेदो रोमाञ्च इत्येच्छक्तिपातस्य लक्षणम् ॥
देहपात (शरीर कोसळणे), कंपन, अतिशय आनंद, घाम फ़ुटणे (स्वेदबिंदू) , रोमांच उभे रहाणे इत्यादी शक्तिपाताची लक्षणे आहेत.
कालांतराने प्रकाश दिसणे, आतून आवाज ऐकू येणे, आसनावरून शरीर वर उचलले जाणे इत्यादी तसेच प्राणायामाच्या वेगवेगळ्या अवस्था बंधांसहित आपोआप सुरू होतात. साधकांना शक्ती मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जात असल्याचा अनुभव लगेचच होतो. आणि मनाला पूर्ण शांती मिळते. तसेच साधकाला त्याच्या शरीरात मोठा फ़रक घडल्याचे जाणवते. पहिल्या दिवशी आलेले सगळे अनुभव पुढे कितीही तास तसेच राहू शकतात. कुणाला केवळ अर्धा तासपर्यंत तर कुणाला तीन तासांपर्यंत देखील हे अनुभव येत राहून मग थांबतात. जोपर्यंत शक्ती कार्यरत असते तोवर साधकाचे डोळे बंदच रहातात आणि त्याला डोळे उघडण्याची इच्छाच होत नाही. जर स्वप्रयत्नांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्रास होऊ शकतो. परंतु शक्तीचे कार्य थांबले की डोळे आपोआप उघडतात. डोळ्यांची उघडझाप ही शक्तीचे कार्य चालू आहे वा थांबले आहे याची द्योतक आहे. साधकाचे डोळे बंद झाले की त्याला आपल्या शरीरात वेगवेगळ्या हालचाली सुरु झाल्याची जाणीव होऊ लागते. आपोआप होणाऱ्या या हालचालींना त्याने विरोध करता कामा नये. किंवा त्यांच्या मार्गामध्ये बाधा आणू नये. केवळ निरीक्षकाप्रमाणे बसून क्रियांना नियंत्रित करण्याच्या जबाबदारीपासून दूर राहिले पाहिजे. अशा स्थितीत त्याला आध्यात्मिक समाधान मिळेल आणि त्याचा विश्वास स्थिर, दृढ होईल.
एकदा गुरुकृपेमुळे शिष्याची योगशक्ती जागृत झाली की त्या साधकासाठी आसन, प्राणायाम, मुद्रा इत्यादी योगदर्शनाशी संबंधित साधनांचे फ़ारसे महत्त्व उरत नाही. ही आसने, प्राणायाम व मुद्रा इत्यादी क्रिया जागृत शक्तीला ब्रह्मरंध्राकडे जाण्यास मदत करतात, यासाठीच त्यांची साधना व सराव केला जातो. ऊर्ध्वगामी शक्तीचा एकदा ब्रह्मरंध्राकडे जाण्याचा मार्ग उघडला की मग तिला क्रियांची जरूर रहात नाही आणि मन हळू हळू शांत होत जाते.
काही प्रसंगी असे दृष्टोत्पत्तीस आले आहे की अशिक्षित आणि ज्याला आसन, प्राणायाम इत्यादी गोष्टींची काहीही माहिती नाही असा साधक देखील या शक्तीच्या प्रभावाखाली सर्व क्रिया शास्त्रोक्त पद्धतीने करू लागतो. जणू काही अनेक वर्षे योगमार्गाचे प्रशिक्षण घेतलेला, सराव केलेला एखादा योगीच असावा. किंबहुना सत्य परिस्थिती अशी आहे की उपरोक्त सर्वच गोष्टी ज्या साधकाच्या प्रगतीला पूरक असतील त्या कुण्डलिनी शक्ती स्वत:च साधकाकडून आवश्यकतेप्रमाणे आपोआप करून घेत असते,
योगातील अनेक अवघड क्रिया विनासायास आपोआप होतात. पूरक, रेचक आणि कुंभक इत्यादी प्राणायामातील क्रियादेखील आपोआप होतात. दोन मिनिटांचा कुंभक एक दोन आठवड्यांतच साध्य होतो. या साऱ्या गोष्टी साधकांना कोणत्याही प्रकारे अडथळा न आणता घडत असतात. कारण जागृत झालेली शक्ती साधकाला कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत याची काळजी स्वत: घेत असते. आपोआप होणाऱ्या क्रियांमुळे साधक निर्धोकपणे साधना करीत रहातो.
सद्गुरूद्वारे शिष्यामध्ये शक्तिपात घडवून आणला गेल्यावर कुण्डलिनी शक्ती जागृत झाल्यावर शिष्याच्या ठिकाणी शक्तिपाताचे सामर्थ्य वृद्धिंगत होते. कारण तो देखील गुरुसारखा बनत जातो. अशा प्रकारे शक्तिपात करण्याची परंपरा गुरुपासून शिष्यापर्यंत अखंड चालू रहाते. शक्तीचे बीज गुरू शिष्यामध्ये पेरत असतात. त्यामुळे गुरूची आज्ञा झाली की शिष्य देखील शक्तिपाताद्वारे दुसरे शिष्य तयार करू शकतो. आणि अशा प्रकारे हा क्रम अखंड चालू रहातो. अर्थात प्रत्येक शिष्याला ही मुभा मिळतेच असे नाही. काही शिष्य स्वत: या शक्तीचा अनुभव घेऊ शकतात परंतु पुढे दिलेल्या श्लोकात सांगितले आहे त्यानुसार दुसऱ्यामध्ये शक्तिसंक्रमण करू शकत नाही.
स्थूलं ज्ञानं द्विविधं गुरुसाम्यासाम्यतत्त्वभेदेन ।
दीपप्रस्तरयोरिव संस्पर्शास्निग्धवर्त्ययसो: ॥
शक्तिपातदीक्षेची स्थूल पद्धती (स्पर्शाद्वारे दीक्षा देणे) ही दोन प्रकारची असून संपूर्णत: गुरूसारखेच होणे व न होणे या तत्त्वातील भेदावर ती आधारित आहे. एक पद्धत अशी आहे की जसा दिवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या दिव्याला तत्काळ प्रज्वलित करतो. आणि त्या दिव्याला देखील ही पात्रता मिळते की तो दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करण्याची शक्ती देतो आणि ही परंपरा अखंड चालू रहाते. दुसरी पद्धती लोखंड आणि परीस यांच्यासारखी आहे. यात परीस लोखंडाला स्पर्श करतो तेव्हा लगेच लोखंडाला सोन्यात परिवर्तित करतो आणि त्या लोखंडाचा (नवीन सोन्याचा) जर दुसऱ्या लोखंडाला स्पर्श झाला तर त्याचे सोने नाही होत. दुसऱ्या पद्धतीत परंपरा कायम रहात नाही हीच कमतरता आहे.
पहिल्या प्रकारात गुरूचा शिष्य स्वत:चे जीवन सार्थक तर करतोच परंतु दुसऱ्याचे जीवन सार्थक व्हावे यासाठी कारणीभूत देखील होतो. परंतु दुसऱ्या प्रकारच्या गुरूचा शिष्य केवळ स्वत:चा उद्धार करू शकतो परंतु दुसऱ्याचा उद्धार करू शकत नाही.
शब्द दीक्षेचे दोन प्रकार आहेत.
तद्वद् द्विविधं सूक्ष्मं शब्दश्रवणेन कोकिलाभ्युदययो: | तत्सुतमयूरयोरिव तद्विज्ञेयं यथासंख्यम् ॥
ज्याप्रमाणे कावळ्याच्या घरट्यात वाढलेले कोकिळेचे पिल्लू , कोकिळेचा स्वर ऐकल्यावर तसेच गाऊ लागते ज्या स्वरात कालांतराने स्वतःच्या पिलांना स्वराची जाणीव जागृत करून देण्याचे सामर्थ्य असते. शब्दांच्या माध्यमातून हा क्रम चालू रहातो. परंतु जो मोर मेघगर्जनेमुळे आनंदित होतो तो मोर आपल्या आवाजाने दुसऱ्या मोरांना आनंदित करू शकत नाही. आणि अशा प्रकारे हा क्रम पुढे अखंड रहात नाही.
दृक् दीक्षेच्या बाबतीत देखील हा फ़रक आहे.
इत्थं सूक्ष्मतरमपि द्विविधं कूर्म्या निरीक्षणात्तस्या:।
पुत्र्यास्तथैव सवितुर्निरीक्षणात् कोकमिथुनस्य ॥
सूक्ष्मतर दीक्षा जी दृष्टिक्षेपाद्वारे दिली जाते त्याचेही दोन प्रकार आहेत. एका पद्धतीत जसे कासवीण आपल्या पिलांवर सतत लक्ष ठेवून त्यांचे भरण पोषण करते आणि त्या पिलामध्ये देखील तशीच शक्ती निर्माण होते. परंतु त्या पिलांना स्वत:ला पिले होईपर्यंत या अंगभूत शक्तीची जाणीव नसते. तसेच शिष्य देखील गुरूकडून मिळालेल्या शक्तीबाबत जागरूक नसतो आणि जोपर्यंत तो शिष्य स्वत:च्या शिष्याच्या संपर्कात नसतो. चक्रवाक पक्षी देखील सूर्यदर्शनाने आनंदित होतात पण अन्य चक्रवाकांना आनंदित करू शकत नाहीत ही दुसरी पद्धती.
आता संकल्प दीक्षेच्या बाबतीत विचार करू:
सूक्ष्मतममपि द्विविधं मत्स्या: संकल्पतस्तु तद्दहितु:|
तृप्तिर्नगरादिजनिर्मान्त्रिकसंकल्पतश्च भुवि तद्वत् ॥
सूक्ष्मतम दीक्षेच्या प्रकारांमध्ये संकल्प दीक्षा देखील येते जिचे दोन प्रकार आहेत. ज्याप्रमाणे मासोळी आपले मन एकाग्र करून, आपल्या बाळाचा विचार करून ध्यानाद्वारे पिलांचे लालन पालन करते हा एक व दुसरा प्रकार म्हणजे जसा मायावी (जादूगार) मायेने शहर वा गाव तयार करून दाखवितो. पहिल्या प्रकारात मासोळीकडून तिच्या पिलांना शक्ती मिळते परंतु दुसऱ्या प्रकारात उत्पन्न होणारा आभास नवीन आभासास जन्म नाही देऊ शकत.
वर दिलेल्या उदाहरणांद्वारे स्पष्ट होते की शक्ती संक्रमण करण्याची परंपरा चालू ठेवण्याची शक्ती निसर्गाने गुरुमातेलाच प्रदान केली आहे. म्हणूनच गुरूला ’गुरुमाऊली ’असे नाव प्राप्त झाले आहे.
एकदा गुरूने आपल्या शिष्यावर शक्तिपात वा दैवी शक्तीचे संक्रमण घडविले , मग तो शिष्य आपोआपच आसन, प्राणायाम, मुद्रा, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या गोष्टी सहज आत्मसात करतो. हे करताना फ़ारसे प्रयत्न वा धडपड करावी लागत नाही, सतत कोणाचे तरी मार्गदर्शन हवे असे नाही. कारण शक्ती स्वत: साधकास वर दिलेल्या गोष्टी करण्यास सहायता तसेच मार्गदर्शन करते.
या साधनेचे वैशिष्ट्य हे की या मार्गात साधकास कोणत्याही प्रकारे इजा वा त्रास होण्याचे भय नसते. हठयोगप्रदीपिकेत निर्दिष्ट केल्याप्रमाणे सामान्य योगाभ्यास, जसे आसन, प्राणायाम इत्यादींचा सराव करताना काही छोटीशी जरी चूक झाली तर शारीरिक इजेला तोंड द्यावे लागते. ’अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भव:।’ परंतु येथे निर्दिष्ट केलेले साधन हे अत्यंत नैसर्गिक स्वरूपाचे आहे. ते शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त करते. इतकेच नव्हे तर बहुतांश असाध्य व्याधींना देखील शरीरात उपटून काढते. सामान्य मनुष्य़ देखील यापासून अनेक प्रकारचे लाभ घेऊ शकतो. योगशास्त्राच्या कठीण, खडतर अभ्यासाने प्राप्त व्हावा असा आत्मानंद, मन:शांती देणारी, वरप्रदायी अशी ही साधना आहे. जो साधक अन्य कोणत्याही प्रकारच्या साधनेने योगशास्त्राचा अभ्यास करतो त्याला वेगवेगळ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि शेवटी स्वत:चे परम कल्याण व्हावे या आशेने फ़ारच कठोर नियमांचे अनुसरण करीत जीवन व्यतीत करावे लागते. परंतु या साधनेद्वारे परमानंद प्राप्त होतोच, इतकेच नव्हे तर साधकामध्ये कुण्डलिनी शक्ती जागृत होताच ती साधकाला आत्मप्रचीती करून देते. साधकाला परमोच्च ब्राह्मी स्थिती मध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टीने शक्तीचे कार्य चालूच रहाते. मध्येच साधकाला अपवादात्मक परिस्थितीत अनेक जन्म घ्यावे लागले तर ही शक्ती जागृत अवस्थेतच रहाते, आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत कधी निद्रित होत नाही. उपरिनिर्दिष्ट सर्वच मुद्दे वाचकांना कुण्डलिनी जागृतीचे महत्त्व पटवून देतील, अशी आशा वाटते.
शक्तिपात मार्गाद्वारे साधकाला एकदा योग्य दिशा मिळाली की तो स्वत: योगदर्शनाच्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकत नाही किंबहुना असे केल्याने त्याला आनंदही प्राप्त होत नाही. तो फ़क्त आतून येणार्या शक्तीच्या आदेशांचेच पालन करू शकतो. अशा आदेशांचे त्याने उल्लंघन केले तर त्याच्यावर संकट आल्याखेरीज रहाणार नाही. जसे माणसाला झोप येत असेल तर, त्याला न झोपून चालत नाही. नैसर्गिक ऊर्मीच्या विरोधात गेल्यास तो अस्वस्थ आणि कष्टी होईल. झोपल्यानेच त्याला शांती आणि सुख प्राप्त होईल. त्याचप्रमाणे जेव्हा साधक आसनावर बसतात तेव्हा त्याना आंतरिक शक्तीकडून आदेश मिळू लागतात की त्याने काय काय करावे वा अमुक प्रकारची क्रिया करावी आणि त्याप्रकारची क्रिया त्याला करावी लागते. त्याने तसे केले नाही तर त्याला अस्वस्थता वाटेल आणि त्रास होईल. पण जर मोकळ्या मनाने आंतरिक शक्तीद्वारे मिळणाऱ्या आदेशांचे पालन केले तर मन:शांती आणि सुखप्राप्ती होईल. स्वत:च्या प्रयत्नांवर ज्यांचा विश्वास आहे असे साधक या प्रकारच्या साधनेवर फ़ारसा विश्वास ठेवत नाहीत आणि ते आंतरिक शक्तीवर अवलंबून रहाण्याऐवजी स्वत: पलीकडील बाह्यशक्ती वर विसंबून रहातात. शक्तिसंक्रमणाचा मार्ग मात्र पूर्ण समर्पण तसेच शक्तीवर आधारित रहाण्याचा आहे. ज्याला या प्रकारे दीक्षा मिळाली आहे त्याने या जन्मी माझी किती प्रगती होईल याचा विचार करता कामा नये. शक्ती जिकडे घेऊन जाईल त्या दिशेने आनंदाने मार्गाक्रमण करण्याची त्याची तयारी असायला हवी आणि शक्ती सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करीत असते. तीच त्याला परमोच्च पदी घेऊन जाईल. आधुनिक काळात ज्या कोणाला योगदर्शनाबाबत उत्सुकता असेल त्याला शक्तिपातासारखा सरळ साधा मार्ग नाही. शक्ती-संक्रमण करणारे अधिकारी महात्मा -त्यांच्या सान्निध्यात जो कोणी येईल, त्याला त्यांची मर्जी संपादन करून आपले जीवन सार्थक करण्याच्या संधीला हातून घालवता कामा नये. या कलियुगात ही परंपरा म्हणजे मृत्युलोकात स्वर्गातून आणलेल्या अमृताप्रमाणे आहे. याच्याशिवाय सोपे आणि अधिक परिणामकारक दुसरे कुठले साधन नाही. या मार्गाने साधकाची दु:खापासून, दूषित विचारांतून, दुष्प्रवृत्तींपासून, दुष्कृत्यांपासून मुक्तता होते आणि त्याला परमशांतीचा अनुभव मिळतो. आपण सर्वांनीच शंकराचार्यांच्या ‘शिवानंदलहरी’तील या श्लोकाचे पठन करून परमेश्वराकडे प्रार्थना करू या-
त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहम् । त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो ॥ दीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यश्चिरं प्रार्थिताम् | शम्भो लोकगुरो मदीयमनस: सौख्योपदेशं कुरु ॥
हे सर्वश्रेष्ठा,
मी तुझ्या चरणकमळांची पूजा करतो आहे आणि तुझे ध्यान करीत आहे, मी तुला शरण आलो आहे आणि हे परमेश्वरा, मधुर शब्दांत प्रार्थना करतो की तू माझा स्वीकार करून करुणापूर्ण दृष्टीने माझ्यावर शक्तिपात करून मला अशी दीक्षा दे की ज्याचा ध्यास देवलोकांतही लागलेला असेल. हे शंभो, जगद्गुरो , माझ्या मनाला खर्या सुखाचा उपदेश कर.
ॐ शांति: शांति: शांति: ।
मराठी भाषांतर- श्रेया महाजन.
No comments:
Post a Comment