Saturday, October 22, 2016

भिती एक चिंतन





भिती हे काळाच्या पोटी निपजलेले काल्पनिक संतान आहे .जे आहे ते हरवेल याची भिती .जे मिळवले ते गमावेल याची भीती .पैसा, प्रतिष्ठा ,घरदार, पत्नी पुत्र ,नाव लौकिक आरोग्य आणि शेवटी देह यावरील आसक्तीच्या रोगाचे ते लक्षण आहे . भीती ही नेहमीच अभिलाषा व महत्वकांक्षा याची सावली असते .ती केवळ स्वतः एकटी कधीच नसते
आपल्याला जे माहित नसते त्याची आपल्याला कधीच भीती वाटत नाही.आपल्याला अज्ञाताची,भविष्याची,अनिश्चिततेची जे माहित नाही त्याची खरेच भिती वाटते का ? आपण भितो जे माहित आहे त्यालाच हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे . आपल्याला मृत्युची भीती का वाटते तर तो आपल्याला माहित नाही म्हणून नाही तर त्यामुळे आपण कमावलेले सारे गमावणार या विचारामुळे ,त्यानंतर काय आहे माहित नाही म्हणून नाही.
चिंता वा काळजी हे भयाचेच एक सूक्ष्म रूप आहे.मला तुझी काळजी वाटते म्हणजे मला भय वाटते तुझ्या बाबत काही वाईट घडू नये याची . मला आता अमुक एक हवे ते मिळणार नाही याचीही भिती वाटते .यात सर्वात जे आहे ते गमावयाचे नाही ही इच्छा किंवा विचार सूक्ष्म आणि सुदृढ असतो .
समोर वाघ उभा राहीला ,विषारी नाग दिसला तर मनात उभी राहणारी भावना भय नाही का ? ती प्राण भयाची नैसर्गिक संवेदना तुम्हाला सैरावैरा धावायला भाग पाडेन किंवा जमिनीला खिळवून दगड्गत निश्चेष्ट करेन .हे भय प्रत्येक सजीव प्राण्यात असते .अन तो क्षण संपल्यावर नाहीसे होते .पण मनुष्यात हे भय सतत विद्यमान असते हे त्याचे मोठे दुर्दैव आहे .ते फक्त मृत्यू भय नसते तर भयाची एक लांब लचक साखळी असते
ही भीती कशी घालवायची, हे रोगट मन कसे निरोगी करायचे .दुसरा कुणीही तुमच्या मनातील भीती पुसू शकणार नाही ,किंबहुना मनात दुसरा आला की भीती येते .आपल्यातील भीती ओळखणे आणि तिला सामोरे जाणे हा राज मार्ग आहे . तिचा धिक्कार न करता, तिची वकिली न करता ती आहे ती पाहू शकणे तिला जाणणे हाच तिच्या पासून सुटकेचा मार्ग आहे .भिती ही मनाची एक वृत्ती आहे . अन ही लहर ज्या पाण्यावर उमटते ते पाणी पाहणे किंवा भिती ज्या कुणाला वाटते त्याला शोधणे एवढे जरी झाले तरी आपले काम होते .
भितीमुळे देवाला शरण जाणे म्हणजे पुन्हा भीती वाढवण्याचाच भाग आहे ,अर्थात संपूर्ण शरणागत हा भितीपासून मुक्त झालेला असतो हे ही तेवढेच सत्य आहे .देह जावो अथवा राहो ही ती स्थिती असते. शरण जाऊनही भीती गेली नाही परत परत उमटत राहिली तर ती एक मनाचा ताण कमी करणारी गोळी होती , म्हणून तिचा स्वीकार करावा इतकेच त्याचे महत्व.पण त्याने भिती पासून मुक्ती मिळत नाही. जीवनात आनंदाचा सत्याचा प्रकाश पडायला हवा असेल तर भयमुक्त होणे अनिवार्य आहे .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

No comments:

Post a Comment