Friday, March 14, 2014

सोऽहं ध्यान आणि सोऽहं भजन- स्वामी मकरंदनाथ



आत्मदीप - स्वामी मकरंदनाथ

सद्गुरूंचा उपदेश ‘ते अक्षय, अविकारी सच्चिदानंद परमात्मतत्त्व आणि तू एक आहात,’ ‘तत्त्वमसि’ असा असतो. शिष्याने सद्गुरूंचा हा उपदेश ‘मी देह-मन-बुद्धी नसून तो परमात्माच मी’ या सोऽहं भावाने श्रद्धापूर्वक ग्रहण करायचा असतो. या उपदेशाच्या प्रचितीसाठी सद्गुरू ध्यानाची साधना सांगतात.

नित्याची गुरुपदिष्ट सोऽहं ध्यानाची बैठक झाल्यावर सोऽहं भजनाचा अभ्यास जरूर करावा.

अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंकडून ध्यानसाधनेची प्रक्रिया नीट समजावून घेतली पाहिजे आणि त्यानंतर नियमितपणे ध्यानसाधना करणे आवश्यक आहे. ध्यानाच्या गुरूपदिष्ट प्रक्रियेत किंचितसुद्धा बदल होऊ नये, ही सद्गुरूंची अपेक्षा असते. त्यामुळे जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा जिवाचे कान करून शिष्याने सद्गुरूंचा उपदेश आणि साधना ऐकावी, समजून घ्यावी. सद्गुरूंचा उपदेश ‘ते अक्षय, अविकारी सच्चिदानंद परमात्मतत्त्व आणि तू एक आहात,’ ‘तत्त्वमसि’ असा असतो. शिष्याने सद्गुरूंचा हा उपदेश ‘मी देहमनबुद्धी नसून तो परमात्माच मी’ या सोऽहं भावाने श्रद्धापूर्वक ग्रहण करायचा असतो. या उपदेशाच्या प्रचितीसाठी सद्गुरू ध्यानाची साधना सांगतात.
ध्यानाची प्रक्रिया सांगताना सद्गुरू सोऽहं भावासह दीर्घ श्‍वास घ्यायला सांगतात. जीवरूपाने असलेला ‘मी’ नाभिस्थानी असून, नाभिकमलापासून ‘सो’ असे श्‍वासाबरोबर म्हणत चिदाकाशात परमात्म्याला भेटायला निघालेला आहे. मध्यमेतून; म्हणजे सुषुम्ना नाडीतून खोल श्‍वास घ्यायचा. श्‍वासाबरोबर नाभिस्थानापासून चिदाकाशात सो शब्दाच्या आलंबनासह पोहोचल्यावर तो श्‍वास क्षण-दोन क्षण रोधून धरायचा. नंतर श्‍वास सोडत असताना परमात्मस्वरूप झालेला मी चिदाकाशातून ‘हं’ म्हणत आपल्या मूळ ठिकाणी; म्हणजे नाभिस्थानी परत येतो आहे, असा भाव धरायचा. मध्यमेतूनच हा श्‍वासदेखील सोडायचा आहे. ध्यानकाळी सुरूवातीला असे सोऽहंच्या आलंबनासहित ५ ते १0 दीर्घ श्‍वास घ्यायचे आहेत. त्यानंतर श्‍वास क्षणभर थांबवणे व सोडणे, ध्यानामध्ये अनिर्बंध काळापर्यंत दीर्घ श्‍वास घेणे ही प्रक्रिया अभिप्रेत नाही. चिदाकाशात सोऽहं भावाने थांबायचे आहे. आज्ञाचक्रापाशी विचार उठलाच तर त्याकडे आतून अलिप्ततेने, साक्षीत्वाने पाहायचे आहे. चिदाकाशात विचारांकडे साक्षित्वाने पाहताना श्‍वास नैसर्गिक पद्धतीने चालू राहावेत. साक्षित्वाच्या अभ्यासाने मनाचे अमन होते आणि पुढे गुरूकृपेने आत्मस्वरूपाचा प्रत्यय साधकाला येतो. हे झाले सोऽहं ध्यान.
सोऽहं ध्यान व सोऽहं भजन यात थोडा फरक आहे. सोऽहं भजनामध्ये श्‍वास घेताना ‘सो’ आणि सोडताना ‘हं’ असे आलंबन मनातल्या मनात धरायचे. अगदी साधा श्‍वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. सोऽहं भजनाच्या वेळी मध्यमेतून दीर्घ श्‍वास अभिप्रेत नाही. श्‍वास घेतल्यावर चिदाकाशात थांबायचेही नाही. आपण आत्मरूप आहेात, अशा भावाने सहज चाललेल्या श्‍वासावर सोऽहंचे आलंबन धरायचे. सोऽहं भजनामुळे ध्यानाच्या मुख्य बैठकीत आपोआप गोडी वाढते. ध्यान उत्तम होऊ लागते. सोऽहं भजनामुळे आपण देहमनाचा साक्षी, कर्मापासून अलिप्त असून, सच्चिदानंद परमात्मा आहोत, असा भाव दृढ होतो. नित्याची गुरुपदिष्ट सोऽहं ध्यानाची बैठक झाल्यावर ज्या कोणाला शक्य असेल त्या साधकाने अशा प्रकारे सोऽहं भजनाचा अभ्यास जरूर करावा. ध्यानाव्यतिरिक्त वेळेत सोऽहं भावाचे चिंतनही करावे. अशा वेळेस कधी आपण रामरूप अशा भावनेने केलेले नामस्मरणही खूप लाभदायी ठरते. सोऽहं भावना प्राप्त करून देण्यास असे नामस्मरण उपयुक्त असते. शेवटी सर्व साधनांचा उद्देश आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत, हा बोध जीवाला व्हावा असाच आहे.
त्यामुळे ध्यानाने, सोऽहं भजनाने, तसेच भक्तिपूर्वक केलेल्या नामस्मरणाने जीवाने सोऽहं बोध प्राप्त करावा; हेच खरे.
(लेखक नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)

No comments:

Post a Comment