Sunday, May 25, 2014

जपमाळेचे जप करण्याविषयी कोणते शास्त्र संकेत आहेत?


  परम पूज्य सद्गुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजींच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेंने –
( हरि ओम. || श्री. गुरूदेव दत्त.||)
जपमाळेचे जप करण्याविषयी कोणते शास्त्र संकेत आहेत?
अंगीरसस्मृतिमध्ये म्हटले आहे की, ' विना दर्भैश्च यत् कृत्यं यत् च दानं विनोदकम् | असंख्या तु यत् जप्तम तत् सर्वं निष्फलं भवेत् || अर्थात - ' कुश (दर्भ) रहित धर्मानुष्ठान, उदकरहित दान व संख्यारहित जप निष्फळ ठरतात.' संख्या गणनासाठी माळेची परमावश्यकता असते. नामधारी शीख ग्रन्थिलमाला, निहंग शीखलोहमाला, मुस्लिम साधक तसबी आणि ख्रिश्चन साधक रोझरी अशा माळांच्या साहाय्याने जप करतात. प्रत्येक पंथोपपंथात जप माळेचे महत्व अनन्य साधारण आहे.
ह्यामागे महत्वाची तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जप माळेमुळे साधकास आपली जप संख्या किती झाली व आणखी किती जप करावयाचा आहे ह्याचा काटेकोर अंदाज येतो; त्यामुळे त्याच्याकडून आपोआपच समय नियंत्रण होते. दुसरे कारण म्हणजे जपमाळेसाठी तुलसी, रुद्राक्ष, कमलाक्ष, भद्राक्ष ह्यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांचा स्फटिक , प्रवाळ ह्यांसारख्या रत्नांचा आणि सुवर्णादी धातूंचा उपयोग केला जातो. त्यामुळे पवित्र आणि विविध गुणधर्मांनी युक्त अशा वस्तूंचा अंगुली सारख्या अतिसंवेदनशील अवयवांना सातत्याने होणारा स्पर्श आरोग्यास हितकारक ठरतो.
परिणामात: त्यांपासून शारीरिक व मानसिक लाभ होतो. तिसरे व महत्वाचे कारण म्हणजे ' ईश्वर: सर्व भूतानां ह्रिद्देशे अर्जुन तिष्ठति | भ्रामयन् सर्वभुतानि यंत्रा रूढानि मायया || ( भगवत गीता - अ. १८ श्लोक ६१) - अर्थात , ' प्रत्येक जिवाच्या हृदयात ईश्वराचा चिरवास असतो. जपाच्या वेळी अंगठ्याचा इतर अंगुलींना सातत्याने स्पर्श होऊन एक विलक्षण विद्द्युत उर्जा निर्माण होते व ती धमनीद्वारा हृदयस्थीत चक्रास प्रभावित करते. हृदयस्थित चक्र प्रभावित झाल्यामुळे इतस्तत: भरकटणार्या मनाचे हृदयस्थ ईश्वराकडून नियमन होते व जपाच्या वेळी मन आपोआप एकाग्र होऊ लागते.' विशिष्ट कार्य सिध्दीसाठी जप करताना विशिष्ट मण्यांची माळ वापरली जाते. त्यानुसार सामान्यपणे; आचारशुध्दिसाठी तुलसीची, परमार्थसिध्दीसाठी
रुद्राक्षाची, मन:शुध्दिसाठी कमलाक्षाची (पद्माक्षाची) , मनोरथसिध्दीसाठी भद्राक्षाची,
पुत्रप्राप्तीसाठी पुत्रवंतीची, शीलसंवर्धनासाठी स्फटिकाची, तसेच अंगीवीरत्व येण्यासाठी व धनप्राप्तीसाठी प्रवाळाची माळ वापरावी. जपमालेसाठी वापरण्यात येणार्या विविध पध्दतींविषयी गुरूचरित्र ग्रंथात म्हटले आहे की , केवळ बोटांनी मोजून जप केल्यास एकपट, अंगुलिपर्वांनी म्हणजेच करमालेने जप केल्यास दहापट, शंखमण्यांनी शतपट, प्रवालामध्ये सहस्त्रपट, स्फटीक मण्यांनी दहसहस्त्रपट, मोत्यांच्या मण्यांनी लक्षपट, पद्माक्ष मण्यांनी दशलक्षपट, सुवर्ण मण्यांनी कोटीपट तर दर्भास गाठी देऊन केलेल्या मण्यांनी तसेच रुद्राक्ष मण्यांच्या माळेने अनंतपट फळ लाभते. ह्यांतील पटसंख्या ही प्रत्यक्ष जपसंख्येस अनुलक्षून नाही, तर त्याद्वारे माळेचे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व सुचवणे हे गुरूचरित्रकारांना अभिप्रेत आहे.
तंत्रसारग्रंथात म्हटले आहे की, ' पद्माक्षैर् विहिता माला शत्रूणां नाशिनी मता | कुशग्रंथिमयी माला सर्व पापप्रणाशिनी || पुत्रजीवफलै: क्ल्रुप्ता कुरुते पुत्रसंपदम् | प्रवालैर विहिता माला प्रयच्छेत् पुष्कलं धनम् || - अर्थात, ' पद्माक्ष (कमलाक्ष) मण्यांची माला शत्रूनाश करते, दर्भग्रंथीमाला पापनाश करते, पुत्रवंती मण्यांची माला पुत्रप्राप्ती करवून देते तर प्रवालामुळे विपुल धन प्राप्त होते.'
केवळ भक्ती हाच उद्देश समोर ठेवून जपसाधना करणार्या वैष्णव साधकाने तुलसीमाला, शैव साधकाने भद्राक्षमाला, गाणपत्य साधकाने हरिद्रा मण्यांची माला , शाक्त साधकाने कपर्दिका (कवड्या) मण्यांची माला वापरण्याविषयी त्या-त्या पंथांच्या तंत्रमार्गीयांचा आग्रह असतो. तथापि, ह्या बाबतीत दूराग्रह न बाळगता आपल्या कामनेस अनुकूल अशी माला वापरणे हे केव्हाही इष्ट ठरते. करमालेचे फळ तुलनात्मक दृष्ट्या अल्प असले तरी करमालेचे साधन ( उपाधन) व संभार अत्यल्प असतो. त्यामुळे घराबाहेर फुरसतीच्या वेळी अवडंबर टाळून इतरांच्या लक्षातही न येऊ देता आपण जप करू शकतो.
जपाच्या वेळी उजव्या हाताच्या मध्यमेच्या मध्यपेरावर माला ठेवून अंगठयाने तिचे मणी आपल्याकडे ओढवेत असा सर्वसाधारण नियम असून त्यावेळी करण्यात येणारा जप हा उपांशू अर्थात पुटपुटत करावयाचा असतो. ज्यावेळी मानस अर्थात मनोमन जप करावयाचा असेल त्यावेळी मणीमाला अनामिकेच्या मध्यपेरावर आणि वाचिक अर्थात मोठ्याने जप करावयाचा असेल तर ती तर्जनीच्या मध्यपेरावर ठेवून अंगठयाने मणी आपल्याकडे ओढावेत असा शास्त्रसंकेत आहे. जप करताना मणी एकमेकांवर आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो. त्यामुळे माळेचे मणी योग्य अंतर राखून सुतामध्ये गाठवून घ्यावेत. जप करताना गोमुखी वापरावी वा माळ वस्त्राने झाकून घ्यावी. जपामध्ये मेरुमणी येताच माळ पालटून घ्यावी; मेरुमण्याचे उल्लंघन करू नये. तथापि, चुकून मेरुमणी ओलांडला गेलाच तर सहा प्राणायाम करावेत. जपाच्या वेळी अपानादी वायूविकार घडल्यास आचमन करावे वा उजव्या कानास दक्षिणहस्तस्पर्श करावा. नंतर पुन्हा पहिल्यापासून जप करावा. तसेच माळ नकळत हातातून खाली पडल्यास पुन्हा पहिल्यापासून जप करावा. जप करताना कोणत्याही दृश्य कारणावाचून
जपमाला तुटून पडल्यास ते अरिष्टसूचक समजले जाते. अरिष्ट परिहारार्थ महामृत्युंजयाचा जप करावा. त्यावेळी प्रथम ' मालास्फूटनसूचितसकलारिष्ट परिहारार्थं त्र्यंबकमिती मंत्रस्य अष्टोत्तरशत / सहस्त्र / अयुत / अयुतचतूष्टय - जपमहं करीष्ये || असा संकल्प करावा.
हा जप किती करावा ह्याविषयी काटेकोर नियम नसला तरी सामन्यात: ' अपमृत्यू
परिहारार्थं अयुत चतूष्टयम्' ह्या वचनानुसार चाळीस हजार जप करावा. पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरुन संकल्पातील उल्लेखानुसार
जपसंख्या कमी करता येते. एका व्यक्तीने एकच ठराविक माळ वापरावी. दुसर्या व्यक्तीची माळ कधीही वापरु नये. जपमाला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप झाल्यावर माळेला पुनश्च वंदन करावे. जपमाळ नेहमी एखाद्द्या चांगल्या पितळी डबीत ठेवावी, जमिनीवर अस्ताव्यस्त पडू देऊ नये. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसर्याला देता येत नाही. परंतु गुरू आपल्या शिष्याला ती देऊ शकतात. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची जप माळ स्मृतिचिन्ह म्हणून जतन करता येते. अशा तर्हेने गुरूंकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीची आठवण म्हणून असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी मात्र करता येत नाही.
|| इदं न मम् ||
   

No comments:

Post a Comment