#श्री_समर्थ_रामदासस्वामी_यांची_गाथा_अभंग_ क्र.१३
आरंभी वंदीन विघ्नविनायक।
जया ब्रह्मादिक वंदितील॥१॥
वंदितील संत कवि ऋषी मुनि।
मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी॥२॥
कार्यसिद्धी होय जयासी चिंतीतां।
त्याचे रूप आतां सांगईन॥३॥
सांगईन रूप सर्वांगें सुंदर।
विद्येचा विस्तार तेथूनीया॥४॥
तेथूनीया विद्या सर्व प्रगटती।
ते हे विद्यामूर्ति धरा मनीं॥५॥
मनीं धरा देव भक्तांचा कैवारी।
संकटीं निवारी आलीं विघ्नं॥६॥
आलीं विघ्नं त्यांचा करितो संहार।
नामें विघ्नहर म्हणोनिया॥७॥
म्हणोनिया आधीं स्तवन करावें।
मग प्रवर्तावें साधनासी॥८॥
साधनाचे मूळ जेणें लाभे फळ।
तोचि हा केवळ गजानन॥९॥
गजाननें देह धरिलें नराचें।
मुख कुंजराचें शोभतसे॥१०॥
शोभतसे चतुर्भुज त्रिनयनु।
तीक्ष्ण दशनु भव्यरूप॥११॥
भव्यरूप त्याचे पाहातां प्रचंड।
चर्चिलें उदंड सेंदुरेसी॥१२॥
शेंदुरे चर्चिला वरी दिव्यांबरें।
नाना अलंकारें शोभतसे॥१३॥
शोभतसे करी फरश कमळ।
एके करीं गोळ मोदकांचे॥१४॥
मोदकांचे गोळ एके करी माळ।
नागबंदी व्याळ शोभतसे॥१५॥
शोभतसे तेज फांकले सर्वांगीं।
उभ्या दोहीं भागी सिद्धीबुद्धी॥१६॥
सिद्धीबुद्धी कांता ब्रह्मयाची सुता।
सुंदरी तत्त्वतां दोघी जणी॥१७॥
दोघी जणींमध्ये रूप मनोहर।
नाना पुष्पं हार चंपकाचे॥१८॥
चंपकाचे हार रूळती अपार।
ब्रीदांचा तोडर वांकी पाईं॥१९॥
वांकी मुरडीवा तें अंदु नेपुरें।
गर्जती गजरें झणत्कारें॥२०॥
झणत्कारें घंटा किंकणी वाजटा।
कट तटीं घाटा पीतांबरू॥२१॥
पीतांबर कांसे कांसीला सुंदर।
वस्त्रे अलंकार दिव्यरूप॥२२॥
दिव्यरूप महा शोभे सिंहासनीं।
मूषक वहीं गणाधीश॥२३॥
गणाधीश माझें कुळींचे दैवत।
सर्व मनोरथ पूर्ण करी॥२४॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान।
आत्मनिवेदन रामदासीं॥२५॥
No comments:
Post a Comment