Monday, May 2, 2022

एकनाथी भागवतातील काही ओव्या


एकनाथी भागवतातील काही ओव्या १६ वा अध्याय २९५ ते ३००
************

माझे स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धी वाचा न कळे पार ।तेथे बापुडी इंद्रीय किंकर। प्राण निर्धार ते नेणे ॥२९५

 या लागी शमदमाच्या अनुक्रमी। मन बुद्धीइंद्रियें वाचा नेमी। प्राण नेमुनि प्राणधर्मी ।आत्मारामी पावशी ॥९६

मन बुद्धयादि इंद्रियनेम ।करावयाचे न कळे वर्म । म्हणसी तरी ते अनुक्रम। ऐक सुगम सांगेन ॥९७

वाचा नेमावी माझे नि नामे । मन नेमावे ध्यानसंभ्रमी । प्राण नेमावा प्राणायामी । इंद्रिय दमे नेमावी॥९८ 

 बुद्धी नेमावी आत्म विवेके। जीव नेमावा परमात्म सुखे। इतकेन तू आवश्यके ।होशी कौतुके मद्रूप ॥९९

 मद्रूप झालियापाठी ।संसाराची न पडे दिठी खुंटल्या जन्म-मरणाचिया  गोठी । गमनागमन आटआटी निमाली ॥३००

Sunday, May 30, 2021

श्री रामदास स्वामी कृत गणेश गीत


#श्री_समर्थ_रामदासस्वामी_यांची_गाथा_अभंग_ क्र.१३

आरंभी वंदीन विघ्नविनायक। 
जया ब्रह्मादिक वंदितील॥१॥
वंदितील संत कवि ऋषी मुनि। 
मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी॥२॥
कार्यसिद्धी होय जयासी चिंतीतां। 
त्याचे रूप आतां सांगईन॥३॥
सांगईन रूप सर्वांगें सुंदर। 
विद्येचा विस्तार तेथूनीया॥४॥
तेथूनीया विद्या सर्व प्रगटती। 
ते हे विद्यामूर्ति धरा मनीं॥५॥
मनीं धरा देव भक्तांचा कैवारी। 
संकटीं निवारी आलीं विघ्नं॥६॥
आलीं विघ्नं त्यांचा करितो संहार। 
नामें विघ्नहर म्हणोनिया॥७॥
म्हणोनिया आधीं स्तवन करावें। 
मग प्रवर्तावें साधनासी॥८॥
साधनाचे मूळ जेणें लाभे फळ। 
तोचि हा केवळ गजानन॥९॥
गजाननें देह धरिलें नराचें। 
मुख कुंजराचें शोभतसे॥१०॥
शोभतसे चतुर्भुज त्रिनयनु। 
तीक्ष्ण दशनु भव्यरूप॥११॥
भव्यरूप त्याचे पाहातां प्रचंड। 
चर्चिलें उदंड सेंदुरेसी॥१२॥
शेंदुरे चर्चिला वरी दिव्यांबरें। 
नाना अलंकारें शोभतसे॥१३॥
शोभतसे करी फरश कमळ। 
एके करीं गोळ मोदकांचे॥१४॥
मोदकांचे गोळ एके करी माळ। 
नागबंदी व्याळ शोभतसे॥१५॥
शोभतसे तेज फांकले सर्वांगीं। 
उभ्या दोहीं भागी सिद्धीबुद्धी॥१६॥
सिद्धीबुद्धी कांता ब्रह्मयाची सुता। 
सुंदरी तत्त्वतां दोघी जणी॥१७॥
दोघी जणींमध्ये रूप मनोहर। 
नाना पुष्पं हार चंपकाचे॥१८॥
चंपकाचे हार रूळती अपार। 
ब्रीदांचा तोडर वांकी पाईं॥१९॥
वांकी मुरडीवा तें अंदु नेपुरें। 
गर्जती गजरें झणत्कारें॥२०॥
झणत्कारें घंटा किंकणी वाजटा। 
कट तटीं घाटा पीतांबरू॥२१॥
पीतांबर कांसे कांसीला सुंदर। 
वस्त्रे अलंकार दिव्यरूप॥२२॥
दिव्यरूप महा शोभे सिंहासनीं। 
मूषक वहीं गणाधीश॥२३॥
गणाधीश माझें कुळींचे दैवत। 
सर्व मनोरथ पूर्ण करी॥२४॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान। 
आत्मनिवेदन रामदासीं॥२५॥

Monday, November 21, 2016

काही आजार व यौगिक उपाय


इथे आजाराच्या अवस्था त्यासाठी सर्वसाधारणपणे उपयोगी योगाचरण सूचित केले आहे. आसनांची नावे सांगितल्यानंतर कोणत्या क्रमाने कोणती कृती करावी हे आपण जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यायला पाहिजे. आसने, प्राणायाम यांबद्दल माहीती असणारे ठिकठिकाणी असतात. मात्र आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमके काय करायचे हे माहीत नसते. ते संक्षिप्तपणे पुढे मांडले आहे

भूक सुधारण्यासाठी : अग्निसार, उड्डियान, भस्त्रिका, दीर्घ श्वसन, मयूरासन.

जळजळ, आगसंवेदना असताना :सीत्कारी, शीतली प्राणायाम.

एक बाजूवरून वारे जाणे :पवनमुक्तासन, भुजंगासन, पद्मासन, वज्रासन, डाव्या-उजव्या नाकपुडीने श्वसन बंद करणे.

दोन्ही पाय पांगळे झाले असता शक्ती सुधारण्यासाठी :पश्चिमोत्तासन, भद्रासन, उग्रासन,भुजंगासन, पवनमुक्तासन.

सांधे दुखणे :पश्चिमोत्तासन, पश्चिमोत्तानासनाचा प्रयत्न, गुदद्वार आकुंचित-विस्फारित करणे, हलासन, सर्वांगासन, भस्त्रिका.

योनिभ्रंश (प्रारंभी) गर्भाशय बाहेर पडणे (बाळंतपणानंतर) : वज्रासनामध्ये बसून अश्विनीमुद्रा, (गुदद्वार आकुंचित-प्रसारित करणे), उड्डियानबंध,गरुडासन, विपरीत करणी,सर्वांगासन, मूलबंध. बाळंतपणानंतर हेच व्यायाम सावकाश करून वाढवत न्यावेत.

जलोदर (प्रारंभिक अवस्था) : मयूरासन, कुक्कुटासन, उड्डियानबंध, अर्धमत्स्येंद्रासन.

बारीक पोटदुखी, चिकट फेसकट शौच :बेंबी आत ओढून ठेवणे, नौलिचालन, अग्निसार, मयूरासन, योगमुद्रा .
  या क्रिया सुरुवातीस 5-10 सेकंद करून पुढे पुष्कळ वाढ करता येते. त्या बाबतीत सुरुवातीस गरज लागेल तर मदत करण्यास तयार रहावे, कंबरेच्या भोवती पट्टयासारखे बांधून धरले असता रोगी पडत नाही. रोग्याचे वजन बोजड असेल तर दोघांनी मदत करण्याची तयारी ठेवावी. मात्र आधीच धरू नये.

रुग्णास व्यायाम करावा ही कल्पना पसंत नसते. पण उत्तेजन देत अमुक सुधारा, आता आणखी चांगले करू शकतोस असे म्हणत चुकीचा भाग सुधारावा. 'येतच नाही, करतसुध्दा नाहीस, कसे बरे होणार?' असे रागावून काम चालत नाही. करवून घेत गेल्यास वारे गेलेले, पांगळे झालेले रोगी हळूहळू आत्मविश्वास मिळवतात. चालणे, स्वतःचे व्यवहार स्वतः करणे हळूहळू शक्य होते.

योगाचरणाचा मुख्य भाग आपण विस्ताराने पाहिला आहे. आजारी व्यक्तींना दुसरीकडे नेता घरीच त्यांच्या दुबळेपणावर त्याद्वारे प्रयत्न करता येतो. आजारी नसणा-या व्यक्तींना -या झालेल्यांकडूनही साधारण मार्गदर्शन करता येते. अर्थात बरे झाल्यावर लगेच अधिक प्रमाणात व्यायाम करू नये हे समजून घ्यावे.

मांसपेशींची शक्ती वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार 1,3,6,12 या प्रमाणाने वाढवत घालणे उपयोगी पडते. पाठ, पोट यांत बरेच वाकणे सांध्यांच्या हालचालींसह हा प्रकार आहे. पुढे वाकत असता श्वास सोडणे पाठीमागे वाकत असता छातीत श्वास भरणे ही पध्दत सदैव ठेवावी.

आतडी पोटाची आजारी अवस्था सुधारली असता त्यातील बारीक आजार तपासणे क्षमता सुधारणे यांसाठी अग्निसार, नौलि, नौलिचालन, उड्डियान भस्रिका श्वासोच्छ्वास हे चांगले उपयोगी पडतात. पोटात गेलेले अगोदरचे अन्न योग्य प्रकारे पचते की नाही याची जाणीव होते.
  फुप्फुसाची शक्ती कमी करणारे आजार बरे झाल्यावर त्याची क्षमता सुधारण्यासाठी प्राणायामाचे क्रमशः आचरण उपयोगी असते. छातीत सावकाश श्वास भरणे (पूरक), श्वास घेण्यास लागला त्यापेक्षा अधिक वेळ सोडण्यास (रेचक) लागेल हे पाहणे श्वास सावकाश सोडून झाल्यावर पुनः लगेच घेता काही सेकंद घेणे असे भाग असतात. प्रथम श्वास कोठेही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न (कुंभक) करता सावकाश घेणे सावकाश सोडण्याचे सातत्य राहते यावर भर द्यावा. योगमुद्रा, पवनमुक्तासन हे आचरणही फुप्फुसांची क्षमता वाढवण्यास उपयोगी असते.

चेतासंस्थेच्या आजारांत अनेकदा ज्ञानेंद्रिये सुस्त राहतात. झापड झोप अनावर होते, अनावर लघवी, अनावर मलविसर्जनाचा वेग अशी अवस्था असते. त्राटक, कपालभाती, नेति, अश्विनीमुद्रा, मूलबंध यांद्वारे यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करता येतात.


म्हणूनच अनेक आजारांत योगाचरणाचा योग्य भाग निवडून समजून त्यासाठी प्रयत्न करण्यास शिकवणे उपयुक्त असते. या विवेचनात आसने कशी करावीत याचा तपशील दिलेला नाही. तो अनेक पुस्तकांमधून उपलब्ध होऊ शकतो. अशी एक-दोन पुस्तके संग्रही ठेवायला हरकत नाही.